काश्मीर खोर्‍यात उत्स्फूर्त बंद   

श्रीनगर : काश्मीर खोर्‍यात पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. मागील ३५ वर्षांनंतर प्रथमच दहशतवादविरोधातील इतक्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक बंद करण्यात आला. या बंदमध्ये विविध राजकीय पक्ष आणि संघटना सहभागी झाल्या होत्या.पहलगाम हल्ल्याचा निषेध म्हणून खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारी शाळा सुरू होत्या. पण, विद्यार्थी संख्या नगण्य होती. श्रीनगरमधील बहुतांश दुकाने बंद होती. पेट्रोल पंप आणि अन्य बाजारपेठादेखील बंद होत्या.
 
जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही बंद होते. सार्वजनिक वाहतूकदेखील कमी होती. काही प्रमाणात खासगी वाहतूक सुरू होती.काश्मीर खोर्‍यात घटनेच्या रात्री कँडल मार्च काढण्यात आला. काल ठिक-ठिकाणी स्थानिक रस्त्यावर आले आणि त्यांनी हल्ल्याचा शांततापूर्ण मार्गाने निषेध केला. यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती.
 
पीडित पर्यटकांना न्याय द्या, पाकिस्तानला शिक्षा द्या अशी मागणी यावेळी केली जात होती. या बंदमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक-धार्मिक संघटना, व्यापारी संघटना आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष, अपनी पार्टीसह विविध पक्षांनी बंदला पाठिंबा दिला होता.
 

Related Articles